एका लग्नाची गोष्ट


प्रकाश  आमच्या ऑफिस मधला इंजिनिअर . दिसायला सर्वसामान्यांन सारखाच .एके दिवशी त्याने अचानक हातात लग्नाची पत्रिका दिली . इतक्या घाई घाई सर्व काही होत होते . आणि आता तर लग्न पत्रिका सुद्धा हातात मिळाली आता त्याला काय बोलणार. त्यामुळे लग्नाची गोष्ट कोणी काढल्यावर माझा नेहेमीचा सल्ला  नीट गप्पा मार मन जुळले तरच पुढे तयार हो, बाकीच्या गोष्टीना महत्व देऊ नकोस हे सांगणे मनातल्या मनातच राहिले.लग्नाला गेल्यावर तिथले चित्र जरा वेगळेच दिसले एकंदर सर्वच उत्साह कमी होता . जाऊद्या आपल्याला काय करायचे मस्त पैकी गुलाबजामच्या जेवणावर ताव  मारून आपल घरी परतलेले बर  असा माझ्याप्रमाणेच आमच्या पूर्ण स्टाफ मेंबरने  विचार केला.
 लग्नानंतर तीन दिवसानंतर जोडी हनिमूनला गेली आता आयुष्याची नवीन सुरवात करायची ह्या आनंदात असणार्या प्र. ला (प्रकाश हे नाव बदलले आहे पण प्रकाशच्या ऐवजी  प्र हे  मिळते जुळते नावच लेखात वापरले आहे) तर प्र.ला भला मोठा धक्का बसला . मुलीने त्याच रात्री प्र.ला सांगितले की माझे मानाविरुध्ह लग्न  झाले माझे दुसर्या कुणावरतरी प्रेम आहे . आता हे ऐकल्यावर त्याच्या तर पाया खालची जमीनच सरकली परंतु काहीही त्रागा न करता त्या बिचार्याने आहे त्या परिस्थितीला सामोरे जायचे ठरवले .
 त्याच्यातला चांगला माणूस जागा झाला. आणि त्याने त्या मुलीला तिच्या  आई वडिलांच्या स्वाधीन करायचा निर्णय घेतला. आपण आपल्या जावयाची फसवणूक केलेली आहे, आणि आता हे जावयाला कळून चुकले आहे हे समजताच नाटकाचा नवा अंक सुरु झाला . मुलीने ऐनवेळी पलटी घेतली . सर्वांनी आता नव्या भूमिकेत प्रवेश केला . मुलीने पोलिसात खोट्या केस ठोकल्या माझ्या सासरच्या लोकांनी मला जीवे मारण्याचा प्रयत्न केला आहे . मुलीच्या वडिलांनी लगेच दहालाखाची मागणी केली लग्न होऊन तीनचार दिवसच होत नाही तर हे असे घडायला लागले. प्र.ला आणि त्याच्या कुटुंबाला इतका  मानसिक त्रास झाला . वर्षभर तो एका दहशती खाली वावरत होता . एव्हड्या काळात त्या मुलीचा प्रियकर पळून गेला आता तिच्याकडे काहीही पर्याय उरला नाही. आता तर तिने प्र.लाच मला नांदायला घेऊन चल असा हट्ट मांडला. 
वर्षभराच्या मानसिक त्रासातून प्र.चे मन फार हळवे झाले होते . पण त्याने ह्या क्षणाला मन खंबीर करून निर्णय घेतला. "नाही" पहिल्यांदाच त्याने हिम्मत करून नाही हा शब्द तोंडातून उच्चारला .' तुझ्या प्रियकराकडे मी तुला घेऊन गेलो होतो त्याने तुला नाकारले असते  आणि त्यावेळेस मला निर्णय घ्यायची वेळ आली असती तर मी नक्की तुला स्वीकारले असते. पण तू जो जहांबाज पणा केला त्यामुळे पोलिसांच्या  ससेमिर्यामुळे माझ्या कुटुंबातील सदस्यांचे मनस्वास्थ बिघडले. आज पैशांच्या कटकटीला  वैतागून जरी तुला स्वीकारायच म्हटलं तरी माझ्या मनात तुझ्या विषई फक्त घृणाच आहे. ह्या सर्व गोष्टीमुळे मी तुझ्याशी संसार करणार नाही.'
प्र.ने तिला पैसे देऊन टाकले आणि फारकत घेऊन टाकली. एका लग्नाची गोष्ट इथे संपली.
प्र.ने अजूनही दुसरे लग्न केले नाही . आता तर तो लग्न करायलाच घाबरतो . कायद्याचे अर्धवट ज्ञान यामुळे त्याला हा त्रास झाला. पैशाला लालुचलेले वकील , पोलीस यांनी पण प्र.ची दिशाभूल  केली. पैशामागे हावरटा  सारखे पळणाऱ्या लोकांना प्र.ची मानसिकता का दिसली नाही? त्याचे मनोबल धासालतेय  हे त्यांच्या लक्षात येऊन सुद्धा  सहजरीत्या त्याकडे दुर्लक्ष केले गेले. दुसर्याचा काय विचार करायचा आपले चांगले होतेय ना मग बस अश्या प्रकारची मेन्त्यालीटी  निर्माण झालीय.
बायकांच्या बाजूने भरपूर कायदे आहे हे जरी खरे असले तरी त्या कायद्याची पूर्ण माहिती ना स्त्रियांना आहे ना पुरुषांना. लग्न झाल्यानंतर लगेच दोन दिवसात घर सोडलेल्या मुलीच्या बाजूने  काहीही कायदा नाही.
प्र .ला तिने दिलेल्या धमक्यांमुळे आपण फार मोठ्या सापळ्यात अडकलोय आणि आता ह्या सापळ्यातून आपण बाहेर पडणे अशक्यप्राय समजू लागल्यामुळेच, त्याने हा मानसिक आणि आर्थिक त्रास सहन केला. 
संस्कार कुणाचे कमी पडले हे एव्हाना लक्षात आलेच असेल. त्या मुलीशी चांगुलपणाने वागणे हा प्र.च्या चांगल्या संस्काराचे  लक्षण होते . त्याच्या असंस्कृत पत्नी आणि सासरच्यांनी असभ्यतेने वागण्याच्या कोणत्याही गोष्टीत कमतरता पडू दिली नाही. मुलं हे नेहेमी वागतांना आपल्या आई वडिलांचे प्रतिनिधित्व करत असतात. मुलीनी तरी वागताना किमान १०० वेळेस विचार केला पाहिजे कारण मुलीला एक पूर्ण कुटुंब घडवायचे असते  . एक चांगला पालक बनणे फार महत्वाचे असते.
चंगळवादाकडे  आधुनिक राहणीकडे झुकलेला समाज , पायाला चाके लावून कुठे धावत आहे हे समजत नाही. आणि या स्पर्धेत आपण मागे राहु की काय या भीती पोटी एक मनुष्य दुसर्या मनुष्याला फसवायला मागे पुढे बघत नाही. भरपूर पैसा उडवायला मिळावा मग तो पैसा कुठूनही आणि कसल्याही मार्गाने  मिळवायचा यावर निर्लज्ज पणाने बोथट होत चाललेले समाज मन पुढील पिढीच्या समोर काय आदर्श ठेवत आहे. 
"नंगेसे खुदा डरता है" अस म्हणून घाबरून कशाला जगायचं आपल्या घाबरण्याचा समोरचा जास्त फायदा घेत असतो हे तर खरच आहे म्हणून लढणे सोडायला नको.
प्र.ची कहाणी अशी जगात घडलेली एकमेव कहाणी नाही. असे किती तरी प्र. या जगात भिऊन जगताय, लढताय . एव्हड सगळ अनुभवल्या नंतर आयुष्यात परत पुढे उभे राहायला कितीतरी जण घाबरताय . खूप वाईट वाटते ह्या अश्या मुलांकडे बघून. त्यांना सगळ्यांना मला हेच सांगावस वाटतय आयुष्य फार सुंदर आहे. सर्व ठिकाणी तसेच अनुभव मिळतील असे नाही. जगण्यासाठी पुन्हा उभारी धरा.
अनघा हिरे 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

शब्द बापुडे केवळ वारा

फिरुनी नवी जन्मेन मी