सण आनंद घेऊनच आला पाहिजे


नव वर्षानंतरचा  पहिला येणारा सण म्हणजे मकर संक्रांत सण जवळ आला की नेहेमी आनंददाई वाटणारी गोष्ट म्हणजे छान गर्दी आणि रंगाने बहरलेली बाजारपेठ . तिळगुळ ,मिठाई विविध रंगी पतंग , मांजा फिरक्या आणि त्या खरेदी करणाऱ्या ग्राहकांची गर्दी. खास  सुरत, बरेली, मुंबई वरून सर्व गावा  गावांना मांजा फिरक्या दाखल झाले आहेत. गतवर्षापर्यंत बरेली मांज्याला प्रचंड मागणी असायची. मात्र, यंदा ही जागा नायलॉन मांज्याने घेतली आहे. नोएडा, दिल्ली, पंजाब, बंगलोर या शहरांतून हा मांजा येतो. मोनोफिल, मोनोकाईट, मोनो गोल्ड, आयबीके, रॅम्बो, चक दे, ड्रॅगन यांसारख्या विविध प्रकारांतील नायलॉन मांजा 80 ते 350 रुपये प्रती रिळ या भावात उपलब्ध आहे. याशिवाय बरेली, पांडा, कुरैशी, स्पेशल मैदानी, टिपू सुलतान, फय्याज बेग यासारख्या विविध प्रकारातील मांजा उपलब्ध आहे. 
तिळगुळा  साठी तिळाचे ढिगारे बाजारातील अजून एक छान आकर्षण, आणि त्या तिळाच्या  धीगार्याना  सजवायला रंगीत फुलांची आरास वा! बघितल्या बरोबर त्याचे आकर्षण वाटणार नाही असा व्यक्ती  क्वचितच बघायला मिळत  असेल . हल्ली साखरेच्या हलव्याचेही बरेच वेगवेगळे प्रकार बघायला मिळतात. महिला वर्गाचे खास आकर्षण म्हणजे काळ्या रंगाचे ड्रेस मटेरीअल आणि  साड्या बाजारात दाखल झाले आहेत  दरवर्षी हौशीनी काळे वस्त्र खरेदी करणाऱ्या स्त्रियांना नवीन व्हरायटी बघायला मिळतायेत .
पहिली संक्रांत साजरी करणाऱ्या नववधू आणि बालकांसाठी हलव्याचे   नव्या नव्या डिझाईनचे  दागिने बघायला मिळतात . अश्या सुंदर सजलेल्या बाजारपेठा आणि घराघरातून येणारे  खमंग  सुवास हे   सण आला  सण आला असे ओरडून सांगतात .
संक्रांतीपासून सूर्याचे दक्षिणायन सुरु होते म्हणजे दिवस मोठा व रात्र लहान या दिवसापासून उत्तर गोलार्धात राहणाऱ्या भारतवासीयांना  अधिक प्रकाश व उष्णता याचा लाभ होतोप्रकृतीचा केवढा मोठा बदल अगदी सहज रित्या घडतांना  दिसतो . तस संक्रांती नंतर तर बरच काही बदलते . कित्येक जणांचे तर आयुष्यच बदलते . बोली भाषेत सुद्धा आपण सहज म्हणतो 'की संक्रांत लागलीय का?'संकटाना संक्रांत म्हटले जाते ... 
पण का? का संकटाला संक्रात म्हटले जाते त्यावर अनेक तर्क काढून सुद्धा मला अद्यापही  उत्तर मिळाले नाही.
संक्रांत जवळ आल्यावर मला हमखास आठवते ते संक्रांतिक दुखः पतंगी मुळे  होणारे अपघात आणि हे अपघात माझ्या मनावर ईतके कोरले गेलेय की त्या आघाताच्या भीतीने मी माझ्या मुलींना सुद्धा पतंगीला  हात लावू देत नाही .
मी लहान होते, लहान म्हणजे खूपच लहान पाच वर्षाची सुद्धा नसेल आम्ही  तेव्हा जुन्या पद्धतीच्या वाड्यामध्ये राहायचो .आमच्या वाड्यातल्या मुलांना  पतंगीचे जाम वेड होते . वेड्यासारखे ते कटलेल्या पतंगीच्या मागे धावत . वास्तविक पाहता ती अगदी पाच दहा पैशाची पतंग असायची
त्याला विशेष मोल नव्हतच तरी देखील एखादी काटलेली पतंग पकडायला मुलांना  काय आनंद मिळायचं कोण जाणे. आणि ह्याच इतरांच्या  पतंग पकडण्याच्या धावपळी मुळे मी अशी काही धडपडली मला तुडवून  किती मुल पुढे गेले . आणि मी मात्र काही दोष नसताना नाहक  जखमी झाली .
अजून काही वर्षांनी माझा एक सहावीचा मित्र वरून छापरावरून पडला आणि आपल्या जीवाला मुकला त्यामुळे पतंगीवरचा माझा राग वाढतच गेला.
 परत एक पतंगी मुळे झालेल्या अपघाताचा किस्सा माझ्याच बाबतीत घडलेला. मी गाडीवरून जात होती. माझी गाडी विशेष वेगात नव्हतीच  रस्त्यात मुले आरडा आरडा करू लागले आणि सगळे माझ्या दिशेने धावतच आले . मलाही काहीतरी अस्वस्थ झाले मी चांगली दोन पतंगीच्या काटा काटीत मंज्याच्या जाळ्यात सापडली होती . मंज्याने माझ्या मानेभोवती विळखे घेतले नशिब  तो मांजा एव्हडा काही भारीतला नव्हता पण ते माने भोवतीचे वेढे काढताना माझे बोट मात्र सरासर कापले गेले . अगदी सेम हाच किस्सा माझ्या लहान्या जावेच्या बाबतीत घडला तिने मानेसमोर आलेला मांजा बाजूला केला आणि ती सरळ पुढे निघून गेली.थोड पुढे जाऊन  गाडी  थांबवत नाही तर तिच्या लक्षात आले तिचा ड्रेस पूर्ण रक्ताने माखलेला होता तिला मानेला पुढच्या बाजूला भलं मोठ कापले गेलेलं . चांगल्या सात आठ टाक्यांनी तिची मान शिवावी लागली .
दोन किंवा  तीन वर्षापूर्वी नागपूरला एकअसच घडलेला पण याहून भयंकर किस्सा बातमी बघताना मन हेलावून गेलं. त्या बातमीने सर्व महाराष्ट्राला हादरून सोडलं होत . एक लहान मुलगा आपल्या वडिलांबरोबर गाडीवरून जात होता .मुलाच्या इच्छे खातर  त्याच्या बाबांना गाडी फ्लाय ओव्हर वरून घ्यायला सांगितली दोन सेकंद पुरेसे होते .  मांजा मुळे त्या मुलाची पूर्ण मान कापली गेली .क्षणात होत्याच नव्हत झाले .दोन सेकंदात वडिलांच्या हातात मुलाच कापलेल डोक आलं ह्या घटनेने पूर्ण महाराष्ट्रालाच हादरून सोडले  होते त्या मुलाच्या  आई वडिलांवर काय प्रसंग ओढवला असेल  असे याची कल्पना न केलेलीच बरी  .मला नाही वाटत ते संक्रांत हा सण कधी साजरा करीत असतील.
नायलॉन मांजा मनुष्य आणि पक्षी या दोघांसाठीही घातक आहे. गाडी चालविताना मांज्यामुळे होणा-या अपघातात दरवर्षी वाढ होतच आहे. पक्षी संक्रांतीच्या दिवसांत जास्त बळी पडतात, संक्रांतीला ह्या अश्याच कित्येक घटना घडतच असतात. पण ना पतंग  उडवणारे सुधारले .ना त्याच्यावर कुणी बंधन घातले.
मोकळ्या मैदानात जाऊन पतंग उडवा . जिथे गाड्यांचा संबंध नाही,इलॆकट्रीकल  पोलजवळपास नाही. खूप  कडे कपारीच्या  किंवा उंचावरच्या जागा नाही अश्या ठिकाणी पतंग उडवायला काहीच हरकत नाही .   
सण आहे मजा करायची नाही अस मी म्हणत नाही पण खरच गरज आहे का काच कुटून तयार केलेल्या मांज्याची किंवा नायलॉन मांज्याची . साध्या  मांज्यानेही  पतंग उडतेच ना! आपण दुसर्यापेक्षा श्रेष्ठ आहोत हे दाखवण्यासाठी मनुष्य अनेक प्रयत्न करत असतो त्यातलाच हा जीवघेणा प्रयत्न दुसर काय!  
सणांची मजा सगळ्यांनी लुटाआणि सगळ्यांना लुटू द्या  बस्स...  
 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

शब्द बापुडे केवळ वारा

फिरुनी नवी जन्मेन मी