सिग्नल

खूप वर्षांपूर्वी मी हि कथा लिहिली होती पण प्रसिध्द मात्र आज करतेय ...आवडली नाही तरी तास सांगा ...लिखाणात अजून काय गोष्टी असायला हव्या होत्या तेही सांगा .
---------------------------------------

सिग्नल 
इवल्या इवल्या हातानी लुगड्याच्या फाडून आणलेल्या तुकड्यात ती वाळलेल्या काडक्यांची  मोळी बांधत होती आणि  दुसर्या हाताशी मंदी....  मंदी तिची चार वर्षाची तिची लहान बहिण....मंदीने पण अंगात असलेली सारी शक्ती लावून  बहिणीच्या डोक्यावर मोळी उचलून देण्याचा प्रयत्न केला...पण तो फसला . ती मोळी सुटली ,खाली पडली बरोबर मंदीही धडपडली.
परत इवलेशे हात कामाला लागले . आता मोळी घट्ट  बांधली . पण डोक्यावर उचलणे अशक्य , 
जवळून अलिशान गाडीतून जाणारा माणूस थांबला .
" काय ग मुलींनो , काय काम आहे तुमच? परत आमच्या बिल्डींग मध्ये यायचं नाही."
त्याच्या ओरडण्याने घाबरलेल्या मुली एकमेकीना बिलगून उभ्या राहिल्या मोळी तिथेच टाकून माघारी फिरल्या .
अलिशान गाडीतल्या माणसाला काही थांबायला वेळ नव्हता तो लगेच निघून गेला .
त्याला पुरेसा लांब गेलेला बघून दोघी पुन्हा आत आल्या आणि टाकून दिलेल्या
आपल्या मोळीला खेचू लागल्या .
अजून कोणी बघत नाहीये ना.... चहू बाजूने नजर फिरवू लागल्या . 
' आहो वाळलेल्या काडक्याच  उचलायला आलोय तुमच्यासाठी  तो कचराच आहे ना? मग आमच्या थोडा कामाला आला तर काय बिघडतंय ? अहो चोर  नाही ओ आम्ही , चोर नाही ए ' मनात उठलेल्या अनेक प्रश्नांसह छाया एका हाताने मोळी आणि एका हाताने मंदीला खेचू लागली .
"ए मंदे तुला ठाव हाय का उद्या अमुषा आहे . उद्या दिवाळी  मागाय लई मजा  येईल बग .
भारी भारी काय बी खाया  मिळत . मागल्या खेपेला म्या  आय संग गेले व्हते तेव्हा
पिसुडी भरून गेली व्हती .. .आल्यावर काय गबा गबा खाल व्हत , पहिले खाऊ  खाला अन नंतर बाप्याच्या लाता. ...पुरून पुरून खाऊ म्हणे तो ...लय दिवस थोड थोड खायचं म्हणत व्हता .
 माग्ल्याच्या मागल्या खेपेला त्यान असच केल . पुरून खायच्या नादापाई लय
कुठ कुठ लपून ठेवायचा . काई दिवस खाताना लय मजा वाटायची मंग काही दिसानी त्याला लय काळा काळा कापूस  लागला . कापूस पुसून खतान चव  यकदम गेली. तुला नसान ठाव. तू लय लान व्हती 
मोळी खेचता खेचत छायाची  बडबड चालूच होती .. मंदी आपली ईकडे तिकडेच बघत होती ..बहिण काय सांगते. कशाबद्दल सांगते तिला काही समजत नव्हत .छायाला  बघून एक सायकल वाला मुलगा थांबला त्याने छायाच्या डोक्यावर मोळी उचलून दिली  .
छाया शांत झाली आता ती आपल्याच तंद्रीत चालत आपल्या वाटेला निघाली .
रस्त्याच्या पलीकडे फुटपाथवर पिवळ्या कापडाचे तिचे त्रिकोणी घर होते घरा बाहेरच
तीन दगडाची चूल मांडून तिची आई गुणी काहीतरी शिजवत बसली होती .
"आये आज जेवाया देणार?" डोक्यावरची मोळी खाली टाकता टाकता छाया बोलली .
तिने सहज चुलीवरच्या पातेल्यात डोकावून पाहिलं तर गुणीने छायाच्या पाठीत जोरदार धपाटा दिला . "मुरदाडा कायला म्हणू टोकते व्हो , लाय शानी झाली का ."
"पन आये लय भूक लागलीय "
"नाय मिळणार. जा कुटून तरी मागून आन "
"शिजवती कायला मंग देत नाय तर "
" हा , लय सायेबाचे लागून गेले रोज जेवाया पायजे ."
रागाच्या भरात छाया तशीच भुकेल्या पोटी तरा तरा चालू लागली डोळ्यातून पाणी आणि तोंडातून बडबड चालूच होती . गुणीने जवळचा दगड उचलला आणि छायाच्या दिशेने भिरकावला , तिचा नेम चुकला , छायाच्या पाया जवळून दगड गेला . आता छाया पळतच सुटली . 
रस्ता ओलांडून सिग्नलवर पोहोचली .सिग्नलच्या एका बाजूला तिची रंजू  मावशी गजरे विणत बसली होती .छाया तिच्या  जवळ जाऊन बसली . एक दोरा हातात धरून दोनचार फुल गुंफू लागली . सिग्नलला गाड्या लागल्या तशी छाया लगबगीने उठली  रंजू मावशीच्या हातातले गजरे घेतले आणि सिग्नलवर फिरत बसली . गजरे विकता विकता एक गाडी जवळ आली गाडीतल्या बाईने तिला रस्ता ओलांडून पुढे ये अस अस सांगितलं . आणि सिग्नल सुटला तशी छायाही त्या दिशेने धावू लागली .हातातले गजरे त्या बाई पुढे धरले . पण त्या बाईला  गजरे काही घ्यायचे नव्हते . त्या बाईने छायाच्या हातात एक पिशवी दिली. त्या पिशवीत भरपूर जेवण होत .
कदाचित तिच्याकडच्या कालच्या पार्टीचे उरलेले अन्न असेल .
छायाला आनंद झाला आता मावशी संभ्या सगळ्यांना बरोबर घेऊन पोटभर खाऊन घेऊ. हातात पिशवी घेता घेता छायाचा विचार चालू होता . 
गुणी लांबूनच पाहत होती छायाच्या हातात ती बाई कसली तरी पिशवी देतेय हे तिच्या लक्षात येताच ती धावतच त्या गाडीपाशी आली . आणि त्या बाई समोर छोटा चेहरा करून गयावया करून हात पसरु  लागली . बाईने गाडीची काच वर सरकवली आणि ती निघून गेली .
गुणीने छायाच्या हातून पिशवी हिसकावून घेतली . बहिणीचे लक्ष आपल्याकडे पडायचा आत  तिथून तिला पळ काढायचा होता .
" आये दे ना "
गुणीने हातातल्या वाळलेल्या काडकीने  छायाच्या पाठीत रापकन ठेवून दिली . तशी
छाया  जोरात कळवळली .गुणीने आपल्या झोपड्याकडे पळ काढला.
छाया हिरमुसली होऊन  रंजू  मावशीकडे परतली मावशीकडे उरलेले गजरे आणि सगळे पैसे देऊन ती पुन्हा गजरा गुंफू लागली .
 रंजू मावशीने बसलेल्या बाडदाना  खालून एक पाव काढला आणि छायाला दिला .
"ये  ले, तुझ्यासाठी लपून ठिवला होता .  गुमान खाऊन घे बे .. संभ्या , रम्या
यायच्या आत, "
"दे तिला, मी कायला काई  बोलीन  . मंगाशी बगत व्हतो छाये मी , गुनाक्का कशी तुला काठी मारून गेली "संभ्या छायाच्या शेजारी येऊन बसला .
खिशातले जमलेले सारे पैसे तो त्याच्या आई कडे देत बोलत होता .
मावशीचा आणि संभ्याचा   छायावर  भारी जीव होता  संभ्या पण लहान पणा
पासून काही खायला मिळाले की आधी छायाला आणून द्यायचा.गुनीच्या मारापासून तर नेहेमी संभ्याच तर तिला वाचवायचा . रंजू मावशी  एकटी दिवसभर गजरे विणायची . एक मामा होते तिला कामात बरीच मदत करायचे . मामाचा पण छायावर फार जीव होता .
संभ्या ,रम्या  रंजू चे मुल आणि त्यांच्या जोडीला छाया दिवस भर सिग्नलवर काम
करत . मामा हे मावशीला फुल आणून द्यायचे , मावशी गजरे विणत बसायची ,छाया गजरे विकायची , संभ्या रम्या हे पण सिग्नलवर काही काही विकायचे . पण भिक कोणीच मागत नव्हते . 
छाया सिग्नल वर मावशी कडे यायला निघाली की गुणी नेहेमी तिच्या एक दोन
पोरांना छाया बरोबर पाठवायची . छाया दोन्ही लहान भावंडाना सांभाळतच सिग्नल वर गजरे विकायची.
छायाचा लहान भाऊ मात्र सिग्नल वर भिक मागत हिंडायचा.
आत्ता पर्यंत छायाच्या पोटात भुकेची आग पेटली होती . ती परत तिच्या घराच्या
दिशेला फिरली . 
मघाच जेवण आत्तापर्यंत आपल्यासाठी राहील नसेल . छाया असा  विचार
करत घरात पोहोचली . तिच्या आईने तिच्या साठी थोड खायला काढून ठेवलं होत.बाकीच तिने कुठेतरी लपवून ठेवलं होत .
छायाने मिळालेलं जेवण  सगळ चाटून पुसून फस्त केल .
"छाये उद्या दिवाळी मागाय येणार ना ग . उद्याची अमुषा हाय . "
छाया भावंडाना परत दिवाळीच्या गमती सांगायला रमली .

दोन दिवसा नंतर....
 आजूबाजूच्या दुकानांची मजा आकाशात दिसणारे फटाके छान छान खायला मिळालेले अन्न यामुळे सिग्नलवर सुद्धा सगळ्यांचीच दिवाळी उजळून गेली होती .
 "दिवाळीच्या दिवसात काय मजा येते ना.लोक काय काय आणून देता, तुला माहिती हाय का छाये संभ्याला कुणी  तरी कपड्याच गठुड दिल त्यात ना एक लय भारी फराक आहे .संभ्या  बोलला मोठ्या लोकां वाणी आपण पण आज  बौबीज करायची तू आम्हाला दिवा  लाऊन ओवळ अन मंगच तुला आम्ही तो फराक देणार  . " रम्या छायाशी बोलण्यात गुंग होता.
तितक्यात कर्कश्य आवाज झाला गाड्यांची गर्दी झाली ईकडे तिकडे आरडा ओरडा चालू झाला . कोण कुठे कोण कुठे पळत होते. लोकांचा गराडा , त्यात कोणी पोलीस , अपघात , काय काय बोलत होते 
गर्दीतून घुसून छायाने वाट काढली . पुढे रक्तच थारोळ आजू बाजूला विक्रीच्या   वस्तू पडलेल्या. 
लोक बोलत होते,' बॉडीला गाडीत घालून नेलाय. कोणीतरी सिग्नलवर समान विकणारा पोरगा होता .. गेला बिच्चारा जागीच . 
दिवाळीत हे असे घडायला नको होते हो एन भाऊबीजेचा  दिवसही हे अस घडल कुणाचातरी भाऊ असेलच ना बिच्चारा .'
छायाने रस्त्यातच टाहो फोडला . नाही गेला तो नाही गेला.. तो माझा भाऊ आहे... तो माझा संभ्या भाऊ आहे ......



अनघा हिरे 


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

शब्द बापुडे केवळ वारा

फिरुनी नवी जन्मेन मी