माझी सखी चीमू .................

दुपारची  मस्त  पैकी झोपलेली होती. चिमण्यांच्या चिवचीवाट माझी झोप मोड
करून गेला. अचानक एवढया चिमण्या घरात आल्या तरी कुठून आणि बराच वेळ
थांबून सुद्धा ह्या अजून जात का नाही मनाशीच विचार केला. मी आता उठून
बसली, चिमण्यांकडे बारकाईने बघू लागली . तीन चार चिमण्यांचे भांडण,
मारामारी चालू होती कि त्या मस्ती करत होत्या कोण जाणे. पण बराच वेळ
त्यांचा हा गोंधळ चालू होता. मला पण छान करमणूक होत होती. तसेही तेव्हा
मला विशेष काहीच काम नव्हते. गरोदर पनाताला आठवा महिना , पलंगावर नुसता
झोपून आराम करणे एव्हडेच तर काम होते माझ्याकडे. त्यामुळे मलाही हा छान
विरंगुळा झाला .
खूप वेळा नंतर त्यात दोनच चिमण्या माझ्या घरात थांबल्या बाकी साऱ्या उडून
गेल्या. त्या दोघी बाहेरून कुठूनतरी काड्या कापूस आणत होत्या. आता माझ्या
लक्षात आले त्या पडद्याच्या पेल्मेटच्या वळचणीत आपले घरटे बनवत होत्या.
मी आता छानशी टेकून बसली चिमणीचे घरटे आता माझा तासंतासाचा करमणुकीचा भाग
झाला.
 दोन चिमण्या एक काळी-पिवळी, अन एक राखाडी-पिवळी. अश्या दोन रंगाच्या दोन
चिमण्या माझ्या घरात मला तर फार छान वाटायला लागले , लहान पणापासून माहित
होते हि नाजूक राखाडी आहे ती चिमणी अनं हा थोडा जाड जुड काळा पिवळा आहे
तो चिमणा. म्हणजे एक चिमणीचे कुटुंब माझ्या घरात राहायला आले होते. मला
पण माझे नवे पाहुणे फार आवडले होते.
दोघांच एकमेकांवर नक्कीच खूप प्रेम असणार कारण तो तिला अन ती त्याला
अनेकदा प्रमाणे चोचीने काहीतरी जेवण भरवत , त्याचं प्रेम व्यक्त करण्याची
पद्धत असणार ती, पूर्ण दिवस भर त्यांचा हाच उद्योग चालू होता.
त्यांच्यातला एकाच बाहेर जायचा काहीतरी घेऊन यायचा आणि दोघे कसे प्रेमाने
वाटून वाटून खायचे . क्षणभर त्यांच्या प्रेमाचा मलाही हेवा  वाटला.
काही दिवसांनी माझ्या लक्षात आले कि त्यांच्या प्रेमाचे अंश त्या घरट्यात
वाढतायेत . जेव्हा छोटी छोटी ची ची सुरु झाली तेव्हा मला पण माझ्या
बाळाच्या आगमनाची घाई झाली. माझ्या बरोबर माझे बाळ सुद्धा त्या चिमणा
चिमणी परिवाराशी जोडले गेले होते.
बिच्चाऱ्या चिमणीचे काम सोपे व्हावे म्हणून मी खिडकी जवळ असलेल्या शिलाई
मशीन वरच दाने ठेवत, एका भांड्यात पाणी ठेवत पण माझ्या चीमुने कधीच
त्याला चोचही लावली नाही.... का? का तिने कधीच मी दिलेले अन्न घेतले
नाही? तिच्याच समोर मी चोवीस तास बसलेली, तिच्या कडे लक्ष ठेवणारी
,तिच्या हालचाली शांतपणे टिपणारी . मला वाटत होते आता मी पण तिची मैत्रीण
झाली असणार पण नाही............ तिचा माझ्यावर एव्हडा विश्वास असू शकत
नाही. मला मनातल्या मनात हे दुख सलत होते.
दिवसा मागून दिवस गेले . चीमुचे पिल्ले थोडेशे मोठे होत होते. एक पिल्लू
साधे पंख ही आले नसताना  , घरट्यातून खाली पडले .चीमुची धडपड सुरु झाली
मी लांबून बघत होते. 'अग राणी ,मी करतेना तुला मदत मला सहज शक्य आहे गं .
मी उचलून ठेऊ का तुझ्या पिल्लाला घरट्यात ? पण त्याचा तू काय अर्थ काढणार
? मी ऐकलंय माणसाचा साधा स्पर्श झालेला तुम्हाला चालत नाही मी उचलून दिल
तर........... तू ठेवशील का तुझ्या पिल्लाला तुझ्या जवळ? बर जरी पिल्लू
तुझ्याकडे  ठेवलं तर मला उगीच घाबरणार तर नाही ना? तू माझ्या घरातून
निघून तर जाणार नाहीस ना? माझे मन अस्वस्थ होत होते . काय करू? माझी काही
मदत होईल का माझ्या चीमुला? पोटातल्या माझ्या बाळाने हात पाय ताणून ताणून
मला सांगितले, 'आई उठ ना तू काय बसली आहेस कर ना मदत तिला.' मी दिवस भर
तशीच बसून राहिली . माझी खूप इच्छा असूनही मी चीमुला मदत करू शकत नव्हते
. घरच्यांना मी सारखी ओरडत होती. कोणी इकडे यायचे नाही कोणी ये जा करू
नका . माझी अस्वस्थता त्या चिमणीसाठी होती हे कोणी समजून घेतले का? काय
माहित! दुसऱ्या दिवशी चीमुचे ते खाली पडलेले पिल्लू मला कुठेच दिसेना अरे
नेमक काय झाल असेन? कुठे असेन ते? ते मेल असेन का? चीमुने त्याला कुठे
लांबवर नेऊन टाकले का? का चीमुनेच त्याला................ मनात असंख्य
प्रश्न पण उत्तर काही मिळालेच नाही.
मला आज चीमुला भेटायचं होत, तिला थोडा जाब विचारायचा होता.....  तू मला
का काही सांगत नाहीयेस ? तुला माझी काहीच दया येत नाही का? माझी
अस्वस्थता तुला समजतच नाहीये का? चिमु नेहेमी प्रमाणेच तिच्या कामात
होती. जणू काय होतंय आणि काय झालेले ह्याच्याशी तिला काहीच कर्तव्य नाही.
किती प्रक्टीकॅल झाली आहेस तू चिमु ? तुझ्या पुढच्या पिल्लांचा विचार
करतेय अगं कालच सगळ विसरली आहेस का? मी माझ्या मनातल्या मनात आक्रोश करत
होते .
मला चीमुचा खूप राग आला दोन दिवस मी चीमुकडे बघितले पण नाही. मी आता
दुसऱ्या खोलीत बसायला लागले . दुसऱ्या खोलीत बसून मी सारखी खिडकीच्या
बाहेरच  बघत बसायची . पण माझ्या चीमुचे विचार काही माझ्या मनातून जात
नव्हते. एका दुपारी चीमू सारखी सारखी ह्या दुसऱ्या खिडकीत पण यायला लागली
. माझी चीमू , तिला पण नाही सहन झाला हा एकांत ती मला बोलवायला आली होती.
जणू माझ्या शिवाय ती पण एकटी आहे हे ती सांगत होती.
कदाचित तिला तेव्हाही माझी मदत हवी असेन मी का नाही समजले हे . चीमू
राणी, मला माफ कर गं मी काहीच करू शकली नाही तुझ्यासाठी. चीमुची खिडकीतली
खड खड खूप काही सांगून गेली . मी उठली, परत त्या खोलीत जाऊन बसली.चिमु पण
माझ्या परत तिथे बसण्याने खुश झाली होती. मी तिथे बसून चीमुला अनं तिच्या
प्रेमळ नवऱ्याला आपल्या पिल्लांची काळजी घेताना बघत होती. चीमुच्या
परिवाराला बघून माझे बाळ पण पोटातल्या छान गिरक्या घेत होते  . चीमुला
माहिती असेल  का कि आता माझ्याकडे पण छानस बाळ येणार आहे. ..... हो
नक्कीच.. तिला माहित होतं म्हणून तर ती मला शोधत शोधत त्या खोलीत आली
होती ती मला जपत असणार. तीला नक्कीच माझी काळजी असणार चीमुचा माझ्यावर
फार जीव असणार हे नक्की चीमू मला खूप शिकवत होती चिमु सारखच मलाही आदर्श
आई व्हायचंय . मनाशी पक्क ठरवून ही ठेवल मी !
एके दिवशी अचानक माझ्या खोलीत कोणीतरी आले आणि एव्हड्या उकाड्यातही मी
पंखा बंद करून का बसली असा प्रश्न करत पंखा  चालू केला. नाही.... नको ...
तो पंखा बंद करा , माझी चिमु आहे तिथे. मी धावतच पंखा बंद करायला उठली.
खूप वेळाने तो स्थिर झाला पण तो पर्यंत काहीच उरल नव्हत.
चीमू  माझी खाली पडलेली.... , न हलणारी...., फक्त डोळे उघडे ...,माझ्या
कडे बघणारे . मी आता काय करू ? मी धावत गेले माझ्या चीमुला हातात उचलले .
पण चीमू गेलेली ........
चीमुला घेऊन मी उभी राहिली.पण उभी झाल्या झाल्या माझ्या पोटात जोराची कळ
आली. चीमू  गेल्याचा धक्का माझ्या बाळाने ही सहन केला नाही. लगेचच मला
हॉस्पिटल मध्ये नेण्यात आले .
छानशी सुंदर, गोड मुलगी मला झाली. माझी चिमु माझ्याकडे परत आली ...

(अनघा हिरे)

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

शब्द बापुडे केवळ वारा

फिरुनी नवी जन्मेन मी