मानसिकता समजून घेतलीच पाहिजे

अमृता काल खास मला भेटायला  घरी आली. ईकडच्या  तिकडच्या गप्पा झाल्यावर तिने सरळ मुद्यालाच हात घातला 
' मला तुझी मदत हवी आहे . खर म्हणजे दिवाळीच भेटण हे फक्त निम्मित्त होत मला तूच सल्ला देऊ शकशील म्हणून मी तुझ्याकडे आलेय . मला खूप अस्वस्थ वाटतंय ग.' अस म्हणता म्हणता अमृता ढसाढसा रडू  लागली .
मी तिला जवळ घेतलं आणि तिच्या डोक्यावरून हात फिरवला तशी ती अजूनच ओक्साबोक्शी रडू लागली .तिच्या रडण्याचे कारण होत ते म्हणजे तिची सासू .
तसा तिच्या सासूचा पहिल्यापासून त्यांच्या  लग्नाला विरोधच होता पण तिची गलेलठ्ठ पगाराची नौकरी त्यामुळे सासूने लग्नाला होकार दिला .
लग्नाची  गाडी नुकतीच रुळावरून धावायला सुरवात झाली तर अमृताला बेडरेस्ट  सुरु झाली . तिला डॉक्टरांनी सांगितलेली सक्तीची विश्रांती परंतू जोडीला सासूचे मिळणारे टोमणे "आमच्या वेळी असे नव्हते, हल्लीच्या  मुलींचे हे फालतू लाड , आम्ही तर घरातले काम करायचो , हंड्याने पाणी भरायचो " हे टोमणे सहन न झाल्यामुळे अमृताने घरातले कामे करायला सुरवात केली . दुखत असतांनाही कामे करायला घेतल्यामुळे तिचे सहा महिन्याचे मिसक्यारेज झाले . आता पुढचा काळ तिचा  फार अवघड होता . आता तर अजूनच आरामाची गरज होती . परंतु सासूच्या राज्यात सुनेला काही आराम करायला जमले नाही . परत काही वर्षांनी तिला बाळाची चाहूल लागली . आता ह्या वेळेस तर पहिल्या पेक्षाही सक्तीची विश्रांती होती . पहिल्या महिन्यातच टाके घातल्यामुळे नऊ महिने तिला पलंगावरच काढावे लागले . तिचा नवरा सुमेध त्या वेळी घरात खूप काम करायचा . सुमेधने सर्व वेळ निभवून नेली कारण ह्या वेळी अमृताला जपणे जरुरी होते परंतू सुमेधच्या आईला हे काही मान्य नव्हते. पुरुषा  सारखा पुरुष आणि घरात बाई सारखे काम काय करतोय हे त्यांचे प्रसिध्द वाक्य रोजचेच झाले . बर सासूबाईच्या   वागण्यात येथे पण दुटप्पी वागणे दिसून आले अमृताची नणंद जेव्हा गरोदर होती तेव्हा ह्याच सासूबाईनी  स्वताच्या मुलीची ईतकी काळजी घेतली आणि वेळेप्रसंगी मुलीकडे लक्ष देत नाही म्हणून जावयाला आणि मुलीच्या सासूला चांगलेच फैलावर घेतले होते . ह्या त्यांच्या दुटप्पी वागण्या विषई त्यांना कधीच कोणी एका शब्दाने  सुद्धा विचारणा केली नाही .अमृता आणि सुमेधला ह्या प्रकरणात विशेष लक्ष द्यावे असे कधी वाटलेच नाही.  
जागतिक मंदीचा फटका अनेकांप्रमाणे सुमेधला सुद्धा बसला त्याची नौकरी गेली .  अमृताच्या नौकारीमुळे घरच्या परिस्थितीवर विशेष फरक नाही पडला.सुमेध आता घरातच होता सुमेध आता बाळाला सांभाळत घरकाम करत होता  आणि अमृता कामावर जात होती . त्यांच्या दृष्टीने सर्व काही सुरळीत चालू होते . परंतु अमृताच्या सासूच्या मते अमृताने घरकाम करूनच नौकरी करावी. आणि कामावरून आल्यावर सुद्धा घरातल्या कामावर रुजू व्हावे . अमृता त्याप्रमाणे घरातली आणि बाहेरची नौकरी व्यवस्थित पार पाडू  लागली एखाद्या दिवशी सुमेधने कामात केलेली मदत अमृताच्या सासूला काही पटायची नाही. घरात रोजच्याच कुरबुरी वाढायला लागल्या . 
अमृता हे सर्व खूप वैतागून सांगत होती खरतर अमृताचा त्रागा करणे एकदमच योग्य होते . त्यांच्यात कुठेतरी संवाद कमी पडत होता हे लक्षात आले .एकतर्फी  निर्णय  देणे एकदम चुकीचे ठरले असते म्हणून मी अमृताला म्हणाले ' हे बघ अमृता , तुझ्यासासुची मानसिकता समजून घे , अस म्हणताच अमृताने माझ्याकडे संशयाने बघितलं चुकीच्या ठिकाणी आपण बोलतोय अस तिला क्षणभर वाटले . पण हे खरेच आहे अमृताच्या सासूची मानसिकता समजून घेतलीच पाहिजे . आपण आपल्या सुनेवर आता पैश्यांसाठी अवलंबून आहोत . आपला एकुलता एक मुलगा पैसे कमवत नाही छोट्या छोट्या गोष्टींसाठी आता आपल्याला सुने पुढे लाचार व्हावे लागणार . एक परकी स्त्री आपण  कायम परकीच म्हणून वागवलेलीआज आपल्या घरासाठी झटतेय  . सुनेवर  नकळत आपण केलेले अन्याय तिला स्वताला मनाला फार बोचत होते . त्यामुळे नकळत मुलावरचा राग ती सुनेवर काढत होती. 
मुलीला आणि सुनेला दोघींना वेगवेगळी वागणूक देताना सुनेने कायम नीटच वागले पाहिजे  अशी अपेक्षा धरतांना सासूने सुद्धा सुनेला छोट्या छोट्या गोष्टींवरून त्रास देणे बंद करावे . सुनेने मुलीप्रमाणे वागावे असे वाटत असेल तर सासूने सुद्धा आई होणे तितकेच गरजेचे आहे ना.
आज समाजात अशी असंख्य कुटुंबे आहेत की ज्यांच्याकडे पुरुष हे घर सांभाळतात.  घरात मुलांना घडवताना पालकांनी मुलांना कामाची सवय लावावी म्हणजे ते आपल्या कामात कमीपणा मानणार  नाही घरात वडील काम करणारे असतील तर त्या घरातला मुलगा हा आपोआप काम करतोच .घरकाम करण्यात कुठला आला कमीपणा .खर म्हणजे घरातल्या पुरुषाचा पण ह्यात फार महत्वाच रोल आहे.
प्रश्न फार काही मोठा नाही पण झालेल्या समस्यांवर सर्वांनी मिळून शांततेत तोडगा काढणे गरजेचे आहे  
प्रथम दर्शनी चित्र हेच सांगत होते की सासूबाईना समुपदेशकाची गरज आहे आणि आपल्याच माणसांनी एकदम शांततेत त्रागा न करता त्यांच्या मानसिकतेला कुठल्याही प्रकारचा धक्का न देता समजावून सांगणे आणि समजावून घेणे गरजेचे आहे त्यात अमृताकडून तर ह्या प्रकरणात सगळ्यांची जास्तच अपेक्षा असणार आहे हे अमृताने विसरायला नको .सासूला सुरक्षित वाटेल असे वातावरण तिनेच निर्माण  करायला पाहिजे म्हणजे सासूबाईना हे सतत पटवून देणे की सुमेधने घरात काम करणे त्या पेक्षा आपण त्याला एखादा व्यवसाय करायला  सांगावे का? तुम्ही पण त्याला त्याच्या कामात काही मदत करू शकाल का? हं  पण हे बोलताना सावध पणे बोलणे गरजेचे आहे  नाहीतर अर्थाचा अनर्थ होऊन प्रकरणाला वेगळे वळण मिळायला नको .जेव्हा आपण निराश असतो तेव्हा प्रेमान वागण , समजूतदार पणाने वागण, कौतुक करत जगन विसरून जातो . अशावेळी आपल्या साध्या बोलण्याचा सुद्धा विपार्ह्यास होऊ शकतो .मग त्या बोलण्या मागची भावना कितीही चांगली का असेना भावनेपेक्षा त्या शब्दांनाच आपण जास्त महत्व देत असतो . त्यामुळे शब्द वापरतांना जरा जपूनच शब्द वापरले पाहिजे .
सगळ्यांना  बरोबर घेऊन जगण्याची मजा आहे . सगळ्यांच्याच मनाचा विचार करायला शिकावे.
अनघा हिरे
नासिक 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

शब्द बापुडे केवळ वारा

फिरुनी नवी जन्मेन मी