स्त्री पुरुष यांची विवाहबाह्य मैत्री



एव्हड्यात अनेक बातम्या वाचण्यात आल्या अमुक एका  नेत्याचे अमुक एका पार्लर गर्लशी असणारे अफैर नंतर त्याने तिच्याशी केलेले लग्न.(समाजाच्या भीतीने  असावे).अजून एका नेत्याने प्रेमासाठी बायकामुलांचाच नाही तर धर्माचाही त्याग करणे . मग लग्न ..ह्या बातम्या सर्रास  ऐकायला  मिळतात. लग्न  आणि लग्ना नंतरचे प्रेम संबंध ह्याचे प्रमाण वाढले आहे का? बदलती समाज व्यवस्था , आधुनिकतेचे  अंधानुकरण हे जरी याला कारणीभूत असले तरी निव्वळ मैत्री करायचीच नाही का?      
 मुलगा आणि मुलगी यातील "नाते" हा विषय पुरातन काळापासून अधिक आवडीने चघळला जात आहे. यावर अनेक मतेमतांतरे व्यक्त होतात, काहीवेळा अकारण वेगळे मुद्दे उकरून, तो विषय नको तेव्हढा तिढा करून ठेवला जातो.
कधी कधी तर, असे नाते प्रत्यक्षात यायला हवेच का? असा  प्रश्न जिथे उद्भवला जातो, तिथे मग पुढे कसलीच चर्चा उद्भवत नाही!! त्या आधारावर बोलायचे झाल्यास, अजूनही आपला मराठी समाज(दुर्दैवाने!!) तितकासा प्रगल्भ झालेला नाही!!. पण, आजही, आपण स्त्री-पुरुष यातील नाते हे,"आई-वडील", "आई-मुलगा किंवा वडील-मुलगी", "भाऊ-बहिण" आणि अशाच पारंपारिक नात्यावर आधारलेले असते. आता, पूर्वीच्या मानाने, स्त्री - पुरुष या नात्यात बराचसा मोकळेपणा आलेला आहे, हे मान्य,  पण अजूनही, या नात्यात जितका मोकळेपणा हवा, तितका आढळत नाही!! अजूनही, आपल्या समाजात स्त्री पुर्षाच्या मैत्रीकडे जरा वक्र दृष्टीनेच बघितले जाते . पाश्चात्य समाजातील,"डेटिंग" हा शब्द मान्य झाला असल्याने, त्याचा जरा तिरकाच अर्थ घेतला जातो.
 खर तर, पुरुषाला स्त्री आणि स्त्रीला पुरुषाची "मैत्री' असणे यासारखे सुंदर नाते नसावे. फक्त, आपल्या मनाचा तितका मोकळेपणा आणि मानसिक प्रगल्भता असणे जरुरीचे आहे,मैत्री म्हणजे प्रेम  आणि  प्रेम हे प्रेमच असते  ते कमी जास्त नसते  ...जो मित्र आवडतो त्यावरही आपल प्रेमच असत...आणि आवडणारे नातेवाईक यांच्यावर सुद्धा प्रेमच असत ...आईवर करतो ते सुद्धा आणि बाबांवर करतो ते सुद्धा प्रेमच असते ....थोडक्यात काय तर आपल्याला आवडणारी व्यक्ती आपण तिच्यावर प्रेम करत असतो...प्रेम हे शाब्दिक असते ,प्रेम हे भावनिक असते, मानसिक असते.. शाररीक असते ती फक्त वासनाच...पण प्रेमाच्या आविष्कारातून झालेली शाररीक जवळीक हे सुद्धा प्रेमच असते.... वासना आणि प्रांजळ प्रेम यात जमीन आसमानाचा फरक आहे ..आणि तिथेच सगळ्या गोष्टी अवघडलेल्या होतात. तिथेच "लक्ष्मणरेषा" आखली जात नाही आणि अनेक गैरसमजाला असले सुंदर नाते बळी पडते. मग या नात्याचा बोभाटाच अधिक होतो.  पण म्हणून त्यामुळे असले नातेच गैरलागू ठरविणे, हा कितपत योग्य विचार आहे? बहुतेकवेळा, स्त्री आणि पुरुष,  या दोघांच्या संमतीनेच "शरीरसंबंध" येत असतात आणि यात तसे पहिले तर, कुणालाच दोषी ठरविणे योग्य नसते.पण अश्या संबधातून संसार तुटला मग त्या नात्याला त्या मैत्रीला काय अर्थ आहे .
आपली एक मैत्रीण आहे, म्हणून तिच्यापासून थोडे अंतर ठेवणे, हे त्या नात्यातील मोठा अडसर असू शकतो आणि तिथे चोरटेपणा उदयाला येतो. खर तर, अशा गोष्टींची काहीच गरज नसते. त्यातून स्त्री आणि पुरुष ह्या मैत्रीचे नाते, केवळ अडचणीच्या काळातच आवश्यक असेल तेव्हाच सांभाळणे  , हे देखील चुकीचे ठरावे म्हणजे मला मानसिक आधार हवा आहे म्हणून मी माझ्या मैत्रीचा आधार घेणे हे स्वार्थाकडे झुकलेले नाही का वाटत ?. अनीती अखेर नेहमीच "गैर" असे म्हणणे आहे . स्वातंत्र्य घ्यायचे, याला देखील काही मर्यादा ठेवणे योग्य ठरावे.
राधा कृष्णाच्या मैत्रीत राधा मैत्रिणीची कधी सखी झाली हे कळलेच नाही .तेच खरे प्रेम आनंदाने जगणे सगळ्यांनाच थोडी  जमू शकेल? .शिवाय जगापेक्षा स्वताच्या मनाचे बंधने काय कमी असतात? मैत्रीच्या आणि प्रेमाच्या अशा संबंधा मध्ये स्त्रियांनी अतिशय जपून वागावे. पुरुष त्याच्या मैत्रिणी बद्दल त्याच्या बायकोला कसेही  सांगून किंवा तिला कसेही समजलेच तर तिला त्यांच्यातील "संबंध" मान्य करायला लावेल(जबरदस्तीने का असेना) किंवा तिच्या विरोधाला न जुमानता, पण स्त्री तिच्या पतीला असे "संबंध" सांगूच शकत नाही कारण पुरुषांची त्या संबंधाला कधीच संमती नसणार. पुरुषांनी असे संबंध ठेवले तर तो त्यांचा उदारमतवादी बाणा असतो आणि त्याच्या बायकोचा जर असा मित्र असेल तर तिला व्यभिचारी ठरवण्याचा त्याचा दृष्टीकोन असतो... आणि इथेच वैवाहिक नाते मोडकळीस निघणारच..वैवाहिक  नात्याला कुठलाही तडा जाईल. किव्हा आपल्या जोडीदाराची फसवणूक केली जाईल अशी मैत्री हि वेळीच थांबवलेली बरी...
अनघा हिरे 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

शब्द बापुडे केवळ वारा

फिरुनी नवी जन्मेन मी