समाजप्रबोधनाची आणि लोकशिक्षणाची गरज आहे


नासिक मध्ये सध्या भयावह गोष्टी घडण्याचे जणू सत्रच चालू आहे .पहिली तर अतिशय लाजिरवाणी आणि प्रत्येक आईबापाला चिंतेत टाकणारी अशीच आहे .एका चवदा वर्षाच्या मुलीवर बलात्कार काय होतो आणि नंतर तिला जीवे मारून टाकले जाते.. ती घटना घडून साधे ८ दिवसही नाही उलटत की लगेच त्याच प्रकारची घटना घडते परत त्या मुलीला मारून टाकले जाते .बर अजून एक गोष्ट अतिशय घृणास्पद एका प्राध्यापकाने फक्त गणपती मंडळाच्या डी जे चा आवाज कमी करण्याची विनंती केली . अन ती विनंती त्या गणेशमंडळाच्या दादा कार्यकर्त्यांना आवडली नाही म्हणून त्या कार्यकर्त्यांनी सदर प्राध्यापकास बेदम मारहाण केली आणि त्या मारहाणीतच प्राध्यापकाचा मृतू झाला. आता परत एकदा तशीच घटना रिपीट झाली. मुलीची छेडकाढणाऱ्या  रोडरोमियोना समजवायला एक प्राध्यापक गेले असता त्या प्राध्यापकाने दिलेले शिक्षण स्वीकारायला तयार नसलेले रोडरोमियो त्यांच्यावरच तुटून पडले  . समाजाचे अजून नवीन झालेले अधपतन म्हणजे ज्या समाजात आपण शिक्षकाला वंदनीय मानतो आज त्या शिक्षकाचे वंदनीय स्वरूप नष्ट झाले .आणि आज अशी परिस्थिती निर्माण झालीय की शिक्षकाचे खून करायला लोक मागे पुढे बघत नाही. 
विषय फार मोठा आहे चवदा वर्षांच्या मुलींवर बलात्कार करण्याची ताकद निर्माण झालीय आणि तीही चवदा पंधरा वर्षाच्या मुलांमध्येच म्हणजे एकदम अजाण वय .ह्या  अजाण वयात चांगल्या वाईटाची समज नाही .. घरात कोणाचे लक्ष नाही . आई वडील कामा निमित्ताने  दिवस भर घरा बाहेर मग ओरडणारे धाक दाखवणारे घरात कोणीच नाही . वाईट  संगतीत वाईट वागणे हे ओघाने आलेच . येव्हाड्या लहान मुलांना हा गुन्हा करावासा वाटणे आणि नंतर तो गुन्हा लपवण्यासाठी अजून एक गुन्हा करण्यास प्रवृत्त होणे . अभावितपणे घडलेला गुन्हा कायद्यापासून  लपवण्याच्या दृष्टीने उचललेले पावलं हे सर्व धाडस मुलां मध्ये निर्माण होते कुठून?
ज्या वयात मुलांच्या हातात पुस्तके हवी त्या वयात त्यांच्या हातात दारूच्या बाटल्या आणि हत्यारे येत आहे .मुलांना शिक्षणाची गोडी निर्माण होईल असे मातृभाषेतील शिक्षण दिले गेले पाहिजे .मुलांकडून नैतिक शिक्षणाचे धडे गिरवून त्यांना चांगल्या कामात गुंतवले पाहिजे . शेवटी रिकाम मन सैतानाच घर हे म्हणतात ते खरच आहे . 
झपाट्याने  होणारे शहरीकरण थोड्याश्या आधुनिक सुखसोईकडे  झुकलेला समाजआता नितीमत्ताच हरवून बसलेला आहे की काय ? टी. व्ही  चानल मधून होणारे चुकीचे सेक्स एज्युकेशन , आणि नाही त्या वयात नाही त्या गोष्टी बघण्याची सवय. अजूनही आपण सेक्स एज्युकेशन कडे चांगल्या दृष्टीने का नाही बघत? आणि आजच्या घडीला अतिशय आवश्यक असणारी हि गोष्ट आपण दुर्लक्षित का केलीय?  टी .व्ही मालिकांन  मधून दिसणारा चंगळवाद हा फसवा आणि नकारात्मक गोष्टीकडे झुकलेले नायकत्व ह्या सर्व प्रकाराला खतपाणी घालतंय कारण  आजकालचे नायक बिनधास्त निगेटिव्ह भूमिकेत दाखवले जातात. कुठल्याही चानेल वरची कुठलीही सिरीयल हि फसवणुकीवर आहेच.सरळ सरळ नितीमत्ता ढासळलेल्या गोष्टी उघडपणे प्रत्येक सिरीयल मध्ये दाखवतात . मध्ये मध्ये येणाऱ्या उत्तेजक जाहिरातीही काही कमी नसतात .समाजाने अनुकरण क्षमता स्वीकारली  आहे पण लोकशिक्षण किंवा  कर्तव्यक्षम का बनता येत नाहीये. समाजाने तटस्थाची  भूमिका बजावण सोडलं पाहिजे. समोर घडणार्या प्रकाराशी आपले काहीच देण घेण नाही अस का असावं . संस्कार देण्यात पालकही कुठेतरी कमी पडतायेत.मुल नेहेमी पालकांचे अनुकरण करतात . आपल्या मुलांना चांगल्या वाईटाची समाज करून देणे हे प्रत्येकाचे कर्तव्यचआहे  .पूर्वी सामाजिकसंस्था आणि सामाजिक कार्यकर्ते समाज प्रबोधनाचे काम पार पाडत. आज निर्माण होणार्या  एन .जी ओ ह्या खरच समाज कल्याणाच्या नावाखाली पैसे निर्माण करण्याचे कारखानेच  तयार होत आहे.प्रशासनाचा हलगर्जी पण काही कमी नाही भ्रष्ट राजकारण्यांकडून अजून काय अपेक्षा आपण ठेवणार! उपोषणाचे अनुकरण आणि चुकीच्या गोष्टीचे उदात्तीकरण लोकांना करायला आवडते. 
आपण हे का स्वीकारत नाही की आपला देश लोकशिक्षणात कमी पडतोय . आपण समाजाचे काही देणे लागतो हे सर्वाना अजून मान्य नाही का? 
खरच आता सामाजिक संस्थांनी तसेच सामाजिक कार्यकर्त्यांनी पुढे येऊन आपल्याला समाज प्रबोधनाच्या कामात झोकून दिले पाहिजे . अन्यथा पुढे निर्माण होणारी पिढी हि समाजासाठी ओझे म्हणून वावरली जाऊ शकते . 

अनघा हिरे 
नासिक 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

शब्द बापुडे केवळ वारा

फिरुनी नवी जन्मेन मी