तो होताच वेगळा, अगदी जगा वेगळा भाग -3


आमचा बघण्याचा कार्यक्रम सुध्दा टिपिकल झाला नाही. मी नेहेमी प्रमाणे सकाळी माझ्या वेळेत कॉलेजला चालत चालत जात होती.
घरापासून कॉलेज जे अंतर चालव लागायचं तिथे वाटेत ते ब्राम्हण समाज मंगल कार्यालय होत. जातांना मला त्या मंगल कार्यालयाच्या गर्दी समोरून चालत जावं लागलं. मंगल कार्यालया वर बोर्ड वाचला आहिरे बोरसे आपले स्वागत करत आहे. बोर्ड वाचला तत्क्षणी इग्नोर सुध्दा केला.
पुढचे वळण वळत नाही तोच मागून गाडीचा ओळखीचा हॉर्न. चालत राहिली छे आत्ता ह्या वेळेस हा कसा काय येईल. पुन्हा हॉर्न वाढला. माझ्या अगदी शेजारीच गाडी उभी करत तो बोलला, चल तुला कॉलेजला सोडतो.
अरे तू आत्ता इथे? घरी काय सांगून आला?
अग ताईच्या दिराच लग्न आहे आज फॅमिली बरोबर आलोय.
अच्छा म्हणजे त्या कार्यालया समोरून मी आले तर तू पाहिलं वाटतं मला. आणि ह्या कपड्यात लग्नाला जाणार?
हो पूर्ण आवरूनच आलोय. सकाळी नानांच्या शिव्या सुध्दा खाल्या चांगले कपडे घातले नाही म्हणून.
हो चांगले नाहीये तुझे हे कपडे.
जाऊ दे कुणी आपल्याला बघायच्या आत चल मी सोडतो तुला कॉलेजला.
मला काय तेच हवं होत. मी लगेच त्याच्या गाडीवर दोन्ही बाजूला पाय टाकून, दोन्ही हात त्याच्या पोटाशी आवळून खांद्यावर डोकं रिलॅक्स करून बसली. क्षणात कॉलेज आले.
काय रे किती लवकर आणून सोडलय.
उतर पटकन, काहीतरी काम काढून निघालोय तिकडून. जावं लागेल.
नाईलाजाने मी उतरली, एव्हाना कॉलेज मध्ये पण बऱ्याच लोकांना समजलेलं होत की हा मुलगा ह्या मुलीचा बॉयफ्रेंड आहे. आणि उलट आपल्या बॉयफ्रेंड बरोबर कॉलेजमध्ये फिरताना मजा यायची. कारण खूप कमी मूल असे होते की त्यांना कोणी साथीदार नव्हते.
सोडायची ईच्छा नव्हती त्याला तरी बळजबरी गाडीवरून उतरावे लागले.
जाता जाता त्याने मला सांगितलं आज आई नाना तुमच्या घरी जाणार आहे. तुझ्या घरच्यांना भेटायला.
'मी काय करू ते सांग घरी लवकर जाऊ की कसं करू सांग '
माहित नाहीये नेमकी कधी जाणार.
' अरे बाबा पण मला काहीच बोलले नाहीये '
' हो ना, मग तू नेहेमी सारखी त्याच वेळेवर घरी जा, ओके, चलो बाय '
तो खरच लगेच निघून गेला. माझ्याबरोबर वेळ घालवावा नाही वाटलं त्याला. मी कॉलेज मध्ये गेली. माहित होत आज घरी काय होणार आहे पण घरी लवकर जायचं सुध्दा नव्हत. कधी नाही तो आज कॉलेज मधला वेळ बोरिंग वाटतं होता. नेहेमीच्या वेळी घरी जायचं अस ठरलेलं होत. मी घरी गेले आणि घरी अतुलचे आई नाना आणि त्याचा. चुलतदादा वहिनी सोबत असे चार जण आमच्या घरी आलेले होते. सगळे हॉल मध्येच बसले होते. मी बघितलं, सर्वांना नमस्कार असं म्हटले आणि आत निघून गेले. तोंडावर पाणी मारलं, एक ग्लास पाणी घटाघट प्यायले, केस आवरले आणि बाबांनी हाक मारली म्हणून परत बाहेर येऊन बसली. अंगावर सकाळ पासून घातलेला, साधा सुधा केशरी बारीक चोकट असलेला ड्रेस तशीच बाहेर जाऊन बसली.
खूप फॉर्मल गप्पा झाल्या. टिपिकल वधू परीक्षा झालीच नाही.
ते सगळे जायला निघाले दारा पर्यंत आम्ही सगळे बाय करायला आलो. ते थोडे पुढे गेले आणि कॉलनीत त्यांनी चुकीचं वळण घेतलं. बाबा मला बोलले की जा पटकन ते रस्ता चुकले त्यांना सांग कुठून जायचं आहे. मी घाई घाईत चप्पल घातली आणि त्यांच्यासाठी पळत सुटली. मागून आई बोलली की पुढे स्टॉप पर्यंत सोडवून ये. मी तशीच धावत गेली आणि मागूनच त्यांना काकू काकू म्हणून हाक मारू लागली.
'इकडून नाही इकडून जायचय, चला मी येते तुमच्या सोबत.'
कॉलनीचे वळण ते बसस्टॉप मी त्या चोघांबरोबर चालत जात होती. इथे आता खऱ्या अर्थाने माझी वधू परीक्षा सुरू झाली. आम्ही पूर्ण रस्ता बोलतच होतो.
कोपऱ्यावर गेल्यावर नेहेमी प्रमाणे मी आमच्या लेफ्ट साइडला सैनिकांच्या मुलांच्या वसतिगृहा बाहेरच्या झाडा जवळ नजर टाकली. अतुल रोज तिथेच उभा असायचा, आणि आत्ता सुध्दा तो तिथे उभा होता. बापरे हा इथे काय करतोय आत्ता. आणि याला कसं माहित मी आत्ता कोपऱ्यावर येईल. सर्व अंदाज पंचे काम होत. त्याला बघितल्यावर कायम माझ्या छातीचे ठोके वाढायचे पण ही धडधड वेगळी होती. ही भीतीची धडधड होती. त्याला त्याच्या आई बाबांनी पाहिले असते तर?
उगाच आडोसा करण्याचा प्रयत्न करत मी काका काकूंना पटवत होते की इथे रिक्षा मिळेल. परंतु इतक्या लांब रिक्षाने जाणे आर्थिक दृष्ट्या बरोबर नव्हतेच. ते बोलले बस कुठे मिळेल ते सांग.
खूप मोठा गोंधळ होणार होता. आता अतुल त्यांच्या दृष्टीस कधीही पडू शकत होता.
'हो आपण क्रॉस करून जाऊ समोर बस स्टॉप आहे.'
परत एकदा झाडापाशी नजर टाकली तर साहेब गायब.
आता निवांत
मी त्यांना बस स्टॉप वर घेऊन गेले. ते सगळे माझ्याशी भरपूर गप्पा मारत होते. उगाच बस भरलेली आहे म्हणून त्यांनी सुध्दा तीन चार बस जाऊ दिल्या.
बस स्टॉपच्या समोरच्या गल्लीत लांबवर उभा असलेला अतुल मला दिसत होता. नशीब त्याच्या घरच्यांच्या दृष्टीस तो आला नव्हता.
बराच वेळा नंतर ते चौघे एक बस रिकामी मिळाली म्हणून गेले. स्टॉप वर मी एकटीच असलेली बघून अतुल त्याची गाडी घेऊन माझ्या जवळ आला. चल चक्कर मारून येऊ अस बोलला.
नाही अजिबात येणार नाही. बस इथेच जरावेळ आपण बस स्टॉप वर बसू , मी नाही येणार. आधीच केव्हाची धाकधूक होतेय.
त्याने गाडी साइडला लावली आणि आम्ही बसस्टॉप वरच बसलो होतो. बस यायच्या थांबायच्या जायच्या, शेअर रिक्षा थांबायच्या रिक्षा वाला आम्हाला यायचं का विचारायचा आम्ही मानेनेच नाही सांगितलं की रागाने बघून निघून जायचा.
येणारे जाणारे आमच्याकडे बघतच जायचे.
मला अतुल बरोबर फिरताना कधीच कुणाची भीती वाटली नाही, कोण काय विचार करेल?कोणी पाहिलं तर? कोणी घरी सांगितलं तर? असे प्रश्न मला कधीच पडले नव्हते. त्याच्या बरोबर खूप बिनधास्त होऊन जगत होते. उलट तोच जरा लाजाळू स्वभावाचा होता.
तो लाजाळू आणि मी बिनधास्त.
सगळ्या गोष्टी मनापासून आणि जीव तोडून केल्या मी.
दोन दिवसानंतर अतुलच्या आईचा माझ्या आईला फोन आला. आम्हाला तुमची मुलगी खूप आवडली आहे आम्ही आज आमच्या मुलाला त्याच्या मित्रा सोबत तुमच्या घरी पाठवू का? आईने लगेच हो सांगितलं.
मी कॉलेजला जाणार तेव्हा आईने मला बजावून सांगितल. तो मुलगा येणार आहे त्याच्या मित्रा सोबत दुपारी बारा वाजता. नाटकं न करता दुपारी बाराच्या आत घरी ये.
मनात विचार केला मी कशाला नाटक करणार? पण ठरल्या प्रमाणे मी बोलली आज महत्वाचे लेक्चर आहे उशीर होईल यायला. उशीरा बोलवं.
फार मोठी महाराणी वाया चालली आहेस तू, सांगते तेव्हढ ऐक, आगाऊ पणा करू नकोस.
मी काहीही न बोलता घराबाहेर निघायला लागली. आई ने दंडाला पकडलं मी काय बोलतेय समजल का तुला?
हो ग बाई येते लवकर, म्हणत मी घराबाहेर निघाली. आजच्या ठरलेल्या प्लानिग नुसार अतुल त्याचा मित्र अभिजीत बरोबर घरी येणार होता. आणि मी तो घरी गेल्यानंतर दहा मिनिटांनी घरी पोहोचणार होते. कारण त्या दहा मिनिटात तो माझ्या आईशी गप्पा मारणार होता.
ठरल्या प्रमाणे मी दहा मिनिटांनी घरी पोहोचली. अतुल आणि अभिजीत हॉल मध्ये एकटेच बसलेले होते आणि त्याच्याशी बोलायचे सोडून आई त्यांना लाजून किचन मध्ये काम करत बसली होती.
मी आली तशी आतल्या खोलीत बॅग ठेवायला निघून गेले.
इकडे अभिजीत अतुलला बोलले की,'हे मॉडेल असेल तर लगेच हो म्हण '
अतुल ने सांगितलं हो हेच मॉडेल आहे.
दोनच मिनिटात मी बाहेर येऊन बसली.
थोड्यावेळ फॉर्मल गप्पा मारून ते निघाले. आता आई सुध्दा दारापर्यंत आली होती.
एक दिवशी मी आणि माझे दाजी अतुलचे घर बघायला जाणार होतो. म्हणजे घर बघून निर्णय घे अस घरच्यांनी सांगितलं होत. मी पण हो बोलली. पण त्याच्या घरापर्यंत मी जाण्याचे योग काही केल्या जुळून येईना.
आमचे रोजचे फोन सुरू झाले कारण काही दिवस कॉलेज बंद होते सर्व डे चालू झाले होते. मला कुठल्याही डे मध्ये इंटरेस्ट नसायचा , पण डे च्या निमित्ताने मला घराबाहेर पडणं शक्य होत. त्या काळी मोबाईल नव्हते. पण आमच्या दोघांकडे लॅण्ड लाईन होता. आमच्या फोन करण्याच्या वेळा ठरल्या. आम्ही एका विशिष्ट पद्धतीने फोन करायचो. एक रिंग वाजल्या बरोबर फोन कट करायचा. अस दोनदा करायच. म्हणजे आम्हाला ते समजायचं की आता पुढचा येणारा फोन हा आपल्यासाठी आहे.
एक दिवशी मी असाच ठरलेल्या वेळेस दोन वेळेस रिंग देऊन फोन केला.
समोरून हॅलो
अरे ऐक, मी नाही येणार कॉलेजला, आज मला सईला सांभाळायचं आहे. तिची आई कुठेतरी बाहेर जाणार आहे. तू नको येऊ कॉलेजमध्ये.
समोरून आवाज आला मी अनंता बोलतोय तुम्हाला कोण हवंय.
काही विचार न करता मी रॉग नंबर लागला वाटतं अस म्हणून फोन ठेवला.
बापरे अनंता म्हणजे अतुलचा लहान भाऊ किती सेम आवाज दोघांचे. बरं झालं त्याला काही समजलं नाही.
आता काय करावं. अतुल पर्यंत निरोप गेला नाही. आणि आत्ता पर्यंत तो निघाला ही असेल. काय करावं सरळ सईला घेऊनच कॉलेजला जायचं ठरवलं. रिक्षा साठी पैसे शोधून शोधून काढले. सईला आवरलं आणि तिला घेऊन रिक्षा करून कॉलेजमध्ये गेले. इकडे आमच्या ठरलेल्या जागेवर अतुल वाट बघतच बसला होता.
तो माझ्याकडे बघतच बसला. हाताशी तुरु तुरु चालणारी सई, आणि तिला संभाळत येणारी मी तेव्हढ्या वेळात त्याने काय काय आणि कितीतरी स्वप्न पाहिले.
अतुलला सांगितले आज अनंता ने फोन उचलला होता. मी काही बोलली नाही. अतुलच्या तोंडून कायम त्याच्या घरच्यांच्या विषयी ऐकत होते. त्यामुळे अनंता मला पूर्ण माहिती होता. अनंताच्या पूर्ण सवयी माहित झाल्या होत्या. हळूहळू अनंताला सांगूया असं अतुलला सुचवलं. पण का कोण जाणे अतुल कायम नाहीच म्हणायचा.
थांब ना आता ठरतंय ना आपलं लग्न, मी तुला सोडू शकणार नाही एव्हडच काय ते म्हणायचा.
मी पण खूप फोर्स केला नाही. मला अतुलशी घेणं होत आणि आता त्याने सगळं जुळवून आणलंय तर होउ देऊ त्याच्या मनाप्रमाणे म्हणून सोडून दिलं.
इकडे काही दिवसात अतुलचे वडील जाम चिडले. ही काय वागायची पद्धत आहे का त्या लोकांची. मुलगी घरी येऊन घर बघून निर्णय घेईल म्हणतात. आणि मुलीचा घरी यायचा पत्ता नाही. आपण आता दुसरे स्थळ बघू. जगात काय ती एकटीच मुलगी आहे का?
रोज त्याच्या घरी त्याचे आणि वडिलांचे वाद चालायचे. मी इकडे माझ्या दाजींवर अवलंबून मी त्यांच्या मागेही लागू शकत नव्हती. आम्हा दोघांना काय करावं समजेना.
अतुल मग त्याच्या अशोक दादांकडे गेला. अशोक दादांनी माझ्या घरी फोन केला की तुम्ही मुलीला आमच्या घरी पाठवणार होते, आमचं घर बघायला. तुम्ही अजून काहीच का पाउल उचलत नाही. तुमचा नकार असेल तर तस सांगा. उगाच लटका लटका राग दादांनी दाखवला. दादा हे वाक्य बोलत असतांना आमचा काय जीव जात होता आमचे आम्हाला माहीत.
मग माझे बाबा माझ्या दाजींना बोलले की संजय हे काय चालू आहे तुझं. काहीतरी मार्गी लावायचं आहे प्रकरण. उद्याचे उद्या तिला घेऊन जा त्यांच्या घरी.
सुटकेचा भला मोठा निश्वास.
ठरल्या प्रमाणे मी तिकडे गेली. आता अतुलला सुद्धा त्याच्या वडिलांना हँडल करायला जमत होते. किती उशीर झाला. अजून ही मुलगी आली नाही मी जातो माझ्या साईटवर अस म्हणून तो सरळ निघून गेला.
मी घरी गेले तेव्हा अतुल तिथे नव्हता. हे काय नवीन ? हे असं मला तर काही कल्पनाच नव्हती. मी आणि संजय दाजी त्यांच्या घरी गेलेलो, दाजी गप्पा मारतायेत मी शांत बसलेली. आम्ही थोड्यावेळाने तिथून निघून गेलो.
थोड्यावेळाने अतुल आणि अशोक दादा त्यांच्याघरी परतले. आता सर्व प्रकार उलटं झालं.
अतुलचे वडील आता त्यांना काका म्हणायचं सोडून मी नाना म्हणायला लागली होती. तर नाना अतुल वर खूप चिडले. ती मुलगी आली होती एकटी शांत बसून होती, ह्याला काही समजत नाही. सरळ घरातून निघून गेलेला. मग नानांनी अशोक दादांना सांगितलं ह्याने सगळं हातच घालवून टाकलं तू त्यांच्या घरी फोन कर आणि ह्याला घेऊन जा. भेट घालून दे त्यांची परत.
दादांनी पडत्या फळाची आज्ञा पाळायची म्हणून लगेच फोन केला आणि माझ्या दाजींना परत भेटायची विनंती केली.
दुसऱ्या दिवशी अतुल दाजींच्या ऑफिसमध्ये आला.
दाजींनी मला तयार केले की मुलगा चांगला आहे लग्नाला हो म्हण.
मी पण आढे वेढे न घेता लगेच हो बोलले अन माझा होकार तिकडे पोहोचला.
आता पुढे खरी मजा
अचानक माझे बाबा बोलले की मुलाचा बिझनेस इतका व्यवस्थित नाही चालत. त्याची आर्थिक स्थिती योग्य नाही. आपण दुसरे स्थळ बघू. आणि त्यांनी कुणीतरी होमिओपॅथी चा डॉक्टर सुद्धा बघून ठेवला. बाबांकडून तुटक वागणूक तिकडच्यांना मिळायला लागली.
परत एकदा नानांनी उग्र रूप धारण केले आणि पुन्हा तेच वाक्य. आपण दुसरे स्थळ बघू. आता अतुल आणि नाना यांचे चांगले वाद झाले. मी चाललो साईट वर म्हणून अतुल उपाशी तापाशी घरातून निघाला. आईनी मागून येऊन थांबवण्याचा प्रयत्न केला. अतुल माघार घेईना आणि नाना सुद्धा त्यांच्या हट्टाला अडून बसलेले. आईनी अतुलला शपथ घालून किमान हेल्मेट तरी घेऊन जा सांगितलं. अतुल हेल्मेट घेऊन घरातून निघून गेला.
मी अतुलच्या घरी सहज फोन केला तेव्हा आईंनी मला सर्व प्रकार सांगितला. तो रागावून घरा बाहेर निघून गेला म्हटल्यावर माझा जीव कासावीस झाला. मी माझी सायकल काढली आणि आम्ही जिथे जिथे भेटायचो तिथे तिथे जाऊन त्याला शोधून आले त्या दिवशी मी साऱ्या जन्माची सायकल चालवली होती.
अतुल कुठेच सापडला नाही मी खूप हतबल झाली होती. घरी आली आणि आई जवळ माझ्या अश्रूंना वाट मोकळी केली. मी इतकी हमसून हमसून रडत होते. रडता रडता बोलत होते की नाही बघायचं मला त्या डॉक्टर बिक्टर चे स्थळ मला ह्याच मुलाशी लग्न करायचं आहे. समजून घ्या ना मला.
आई बोलली काही नाही आम्हाला बघायचं होत हे तुझ्या मनाप्रमाणे होतंय का ? म्हणून आम्ही विरोध करत होतो. तू तयार आहे तर काहीच अडचण नाही. आईने बाबांना समजून सांगितलं.
इकडे अतुल संध्याकाळ पर्यंत घरी गेलेला नव्हता. आईंनी सुद्धा रडून रडून घर डोक्यावर घेतले होते. त्या नानांना खूप ओरडत होत्या संध्याकाळी नानांचा माझ्या वडिलांना फोन की आता आपल्या मुलांनी ठरवलेच आहे तर करू त्यांच्या मनासारखं. इकडे बाबांच्याही काही हातात नव्हते. ते सुद्धा हो बोलले. दुसऱ्याच दिवशी आमच्या लग्नाची बोलणी करण्यासाठी बैठक घरी बसणार होती.
हे ऐकून मला खूप हायस झालं. पण अतुल कुठे आहे? तो अजूनही घरी गेलेला नव्हता. मी त्याच्या काळजीत जीव लावून बसली होती.
संध्याकाळी मी नेहेमी प्रमाणे कॉलनीच्या कोपऱ्यावर जाऊन बसली एकटी शांत उदास. कारण माझ्या अतुलचा कुठेच आता पत्ता नव्हता. समोरून गाडीवरून येणारी अतुल सारखी धूसर आकृती पहिली, डोळ्याच्या कडा पुसल्या आणि हो तो समोर असलेला अतुलच होता. मी त्याच्या दिशेने चालू लागली.
कुठे होतास तू? मला न सांगता कुठे गेला होता? तुला किती शोधलं मी?
समोरून शांत स्वरात तो बोलला मी पिच्चरला गेलो होतो.
सगळ्यांना टेन्शनमध्ये ठेवून तू पिच्चर बघत बसला?
तो सुखरूप असल्याचा आनंद इतका होता की त्याच्यावर चिडणं झालंच नाही. तो मला बोलला तुला एक गुड न्यूज द्यायचीय. मी पण त्याला सेम हेच बोलले.
त्याची गुड न्यूज फार वेगळी होती. तो बोलला आपण उदया मंदिरात जाऊन लग्न करतोय. घरचे नाही तयार होणार.
काय रे सारखं सारखं मंदिरात जाऊन लग्न करू? अरे घरचे तयार झाले आहेत. उद्या आपल्या लग्नाची बोलणी आहे. माझ्या घरी बैठक आहे.
काय बोलते, चल बैस गाडीवर सेलिब्रेशन करू.
हो जाऊ ना . पटेलच्या दुकानात चल आधी आणि कॉइन बॉक्स वरून फोन कर तुझ्या घरी तुझ्या आईला. मग निवांत फिरू.
पण माझ्याकडे जास्त वेळ नाही ह. अश्विनीच्या घरी जातेय असं सांगून बाहेर निघालीय.
दुसऱ्या दिवशी आमच्या घरी लग्नाची बैठक बसली.
आमच्या लग्नाच्या अडचणींची अजून पूर्तता व्हायची होती. आम्हाला खूप गोष्टींना पुढे तोंड द्यायचे होते.
कारण आमच्या लग्नाची बैठक बसली ती आमने सामने पार्टीची, एकमेकांचा विरुद्ध पार्टीची. जिथे कुणालाही काहीही आणि कसलीही माघार घ्यायची नव्हती. जो तो समोरच्याला खाली खेचायला बसला होता. आता ह्या खेचा खेचित आमचेच मरण होत होते.
सर्वांच्या संमतीने लग्न करायचे माझाच हट्ट होता. आणि येण्याऱ्या सर्व दिव्यांना तोंड द्यायची माझी तयारी होती. कारण सोबत कायम अतुल होता . पुढील लढाई साठी आम्ही दोघे तयार होतो...
( क्रमशः)
अनघा अतुल हिरे

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

शब्द बापुडे केवळ वारा

फिरुनी नवी जन्मेन मी