तो होताच खूप वेगळा,अगदी जगा वेगळा. भाग -1

 

त्याच्या माझ्या पहिल्या भेटीपासून मला जाणवलं होत हा काही वेगळाच आहे. त्या दिवशी कॉलेज सुटल्यावर मी घाई घाईत चालत घराच्या दिशेने येत होती. कॉलेज ते घर 3 किलोमिटरचे अंतर, यायला जायला काही साधन नाही. म्हणून रोजचा प्रवास चालतच. अशीच मी घाईत घरी यायला निघाली आणि अचानक माझ्या मागून येणाऱ्या गाडीवाल्याचा गाडी वरचा कंट्रोल गेला आणि त्याने मागूनच मला जोरदार धक्का दिला. मी थोडी लांब जाऊन पडली. हातातली पुस्तकं रस्त्यावर अस्थाव्यस्थ पडली. खूप लागलं, खूप खरचडल. स्वतःला सावरत मी उठायचा प्रयत्न केला. त्याने गाडी बाजूला लावली आणि मला सावरायला तो जवळ आला. डोळ्यातल्या अश्रूनेच मी त्याच्याकडे रागाने कटाक्ष टाकला.
खूप सॉरी म्हणत तो समोर आला माझे पुस्तकं उचलून दिली. आणि मला हात देत तो बोलला," मी तुम्हाला घरी सोडून देतो."
"तुझ्याबरोबर मी येईल असं वाटलं का तुला?"
"प्लिज माफ करा, चुकून झालं, गाडी कंट्रोल बाहेर गेली होती"
"हो ना, तू गाडी वाला चालणाऱ्या लोकांची काही किंमतच नाही ना तुझ्या दृष्टीने"
"हो मान्य आहे मला, पण हट्ट नका करू आपण आधी दवाखान्यात जाऊ. खूप खरचटलं आहे तुम्हाला"
नको मी जाईल माझी माझी असं म्हणत मी जागेवरून उठण्याचा प्रयत्न केला. माझा पाय लटलट कापत होता. पायाचा थरकाप मला धड उभं राहू देईना.
त्याने परत धावत येऊन बळजबरी आधार दिलाच.
"हे बघा हट्ट करू नका. मला हँडल करू द्या सर्व"
त्याने माझी बॅग माझे पुस्तक त्याच्या गाडीच्या डिक्कीत टाकली आणि त्याच्या गाडीवर मी अलगद मागच्या रॉडला पकडून बसले.
एका छानशा हॉस्पिटल मध्ये माझ्यावर मलम पट्टी झाली. आता माझा राग थोडाफार कमी झाला होता.
अचानक त्याने माझ्या हातावर थोपटत बोलायला सुरुवात केली. काही वर्षांपूर्वी माझा सुद्धा असाच अपघात झाला होता. माझा काहीही दोष नसतांना मी तर साईडला उभा होतो.आता माझ्या पायात स्टीलची प्लेट लावली आहे.
बापरे म्हणजे माझं तर नुसतं खरचटलं होत. ह्याने तर किती यातना सहन केल्या. त्याचे बोलणे, त्याची माझी घेतलेली काळजी, माझ्याशी आहो जाहो करून बोलणं, त्याचे दुखणे आणि अचानक त्याचा माझ्या हाताला झालेला स्पर्श.
माझा राग शांत होता होता पूर्ण निवळून गेला. आता मी सुद्धा त्याच्याशी अदबीने बोलू लागली.
मला चालणे अशक्य होते तेव्हा त्याने आधाराला दिलेला हात, त्या हाताचा स्पर्श मला अजूनही आठवतोय मऊ मऊ हात. कदाचित मी जास्तच ऍडवांटेज घेतले मी ही नंतर त्याचा हात करकचुन पकडला.
त्याने नंतर मला माझ्या घरी सोडले.
आणि बाहेरच्या बाहेर निघून गेला.
कोण होता तो? काय नाव होतं त्याचं?ना त्याने मला नाव विचारलं ना मी त्याला. संपली का ही भेट.
घरात आल्यावर आईच्या प्रश्नांना मोघम उत्तरं दिली. लक्ष सगळं त्या अनोळखी व्यक्ती जवळ घुटमळत होते. आज माझे मला राग आला इतक रागाने बोलत होती त्याच्याशी की त्याने साधं आपलं नाव सुद्धा नाही विचारले.
राग होता त्याच्या विषयी मग आता का त्याची हुरहूर लागली. अस्वस्थ मी झाली तसाच तो ही असेल का तेव्हढा अस्वस्थ.
दुसऱ्या दिवशी एक माणूस घरी आला त्याच्या हातात माझी कॉलेजची बॅग होती.त्याच्या मित्राच्या डिक्कीत ती राहिली होती म्हणून तो द्यायला आला होता. अस सांगत होता. मला कालचा प्रसंग आठवला. घाईघाईत मी बॅग त्याच्याच डिक्कीत विसरली होती. त्याच्या हातातून मी बॅग घेतली आणि दाराबाहेर इकडे तिकडे खुप खोल नजर फिरवली आणि त्याला थँक्स बोलले. तो लगेच निघून गेला. तो निघून गेल्यावर मी भानावर आले. अरे हे काय ह्या माणसाला आपण साधं पाणी विचारलं नाही. तेव्हढच पाणी पिण्याच्या वेळेत त्याच्या मित्राची थोडी फार माहिती काढली असती.
आलेला चान्स सुद्धा घालवला.
दोन दिवस असेच हळहळत घालवले.मन सुध्दा सैरभैर धावत होते त्या अनोळखी माणसासाठी. का? आता काय करणार? त्याची तर साधी विचारपूस सुद्धा केली नाही. मग आता ह्या हुरहुरीला काय अर्थ आहे. सगळं शांत आणि निरस वाटायला लागलं होतं.
काही दिवसांनी अचानक जादू झाली. घरातला लँड लाईन खणखणला.
समोरून तोच आवाज हाय शारू.
मी प्रश्नार्थक होण्याचा आव आणून विचारले, कोण?
ओळखल नाही का? मी तो तुझा व्हिलन. तुला गाडीने उडवणारा.
अरे मनात आलं छे रे तू कसला व्हिलन, तू तर हिरो आहेस आता माझा. मला गाडीने उडवलेला तू नाही आठवत. मला आठवतो तो तू माझी काळजी घेणारा मला हात देणारा. पण नाही काही बोलली सर्व मनात चुपचाप गिळून घेतलं.
नंतर तोच बोलत होता आणि मी ऐकत होते.
दोन दिवस बाहेर गावी साईट वर गेलो होतो म्हणून विचारपूस केली नाही. तुझी बॅग माझ्या डिक्कीत राहून गेली होती. त्यातल्या तुझ्या डायरीवर तुझं नाव आणि फोन नंबर मिळाला. छान लिहितेस तू.
" तुम्ही माझी डायरी का वाचली?"
'असंच'
तब्येतीची चौकशी झाली आणि फोन ठेवला गेला.
बापरे आत्ता सुद्धा मी त्याला त्याच नाव नाही विचारलं, तो कुठे राहतो काही काही माहीत नाही. हा एव्हड मात्र समजलं तो साईट वर गेला होता म्हणजे तो नक्की इंजिनिअर आहे.
छे माझ्या सारख्या आर्ट्स मधल्या मुलीला हा तर ढुंकूनही पाहणार नाही.
मनात प्रेमाच्या निर्माण झालेल्या भावना तिथेच रोखल्या.
आता बऱ्याच दिवसांच्या गॅप नंतर मी सुरळीत कॉलेजमध्ये जायला सुरवात केली.
कॉलेज सुटल्यावर तेच चालत घरी येणं आणि तोच रास्ता.आता तो रस्ता आणि मी असे दोघे नव्हते तर तिथे होत्या माझ्या अपघाताच्या सुखद आठवणी,आणि त्याच रस्त्याने जातांना होता मनाचा तो हळवा कोपरा.
अचानक त्या दिवशी जिथे माझा अपघात झाला होता तिथेच तो त्या दिवशी माझी वाट पहात उभा होता.
त्याच्या हातात माझी डायरी होती.
माझी डायरी जिचा मला पुरेपूर विसर पडला होता.त्याने हळुवार हाक मारली शारू...
मी चाचपून त्याच्याकडे पाहिलं. माझ्या चेहऱ्यावर आनंद आणि स्मित होत ते फक्त त्याच्याच साठी.
तुझी डायरी द्यायची होती. मला माहित होतं ह्या वेळेला तू नक्की इथून जाणार.
त्यानेही तब्येतीची वायफळ चौकशी केली नाही.सरळ शेकहॅन्ड साठी हात पुढे केला. मी पण आघाश्या सारखा हात पुढे केला.
तो म्हणाला
' मी अतुल '
आज आम्ही एका हॉटेल मध्ये चहा प्यायला गेलो.बऱ्याच गप्पा मारल्या. मी सहज त्याच्या गाडीवर बसत होती. आता माझा हात रॉड पकडत नव्हता. माझा हात त्याचा खांदा पकडत होता.
नित्य नियमाने त्याचे माझ्या कॉलेज जवळ येणं आणि मला घरापर्यंत म्हणजे घराच्या कोपऱ्या पर्यंत सोडवणं सुरू झालं.
किती सुंदर दिवस होते ते. एकासुंदर नात्यात आम्ही गुंतत होतो. एकमेकांना भेटल्याशिवाय करमेना. कॉलेजमध्ये थांबणं कमी झालं. गाडीवर बसण्याच्या पद्धती बदलल्या. घरातून चोरून सर्व गोष्टी फुलत होत्या. भेटीची आतुरता वाढायला लागली.
खूप दिवसांनी त्याला समजले की आम्ही दोघे एकाच कास्टचे आहोत. तेव्हा तो मला समाजाच्या कार्यकर्त्यांच्या घरी घेऊन गेला. आणि सर्व प्लानिग निशी आम्ही अरेंज मॅरेजचे रूप देऊन आमच्या घरच्यांसमोर आलो.
आमच्या भेटीनंतर पूर्ण दीड वर्ष लागले आम्हाला एकत्र यायला.
दोघांचा जीव नुसता धाकधूक होत होता. कारण हट्टी पालकां पुढे आमच्या प्रेमाचा बळी जातो की काय असे वाटू लागले होते ते अगदी लग्न होई पर्यंत....
अनघा अतुल हिरे

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

शब्द बापुडे केवळ वारा

फिरुनी नवी जन्मेन मी